औरंगाबाद - ऊसाच्या फडात काम करण्यासाठी आलेले कामगार सकाळी कामावर गेल्यावर अज्ञाताने त्यांच्या मुलीचे अपहरण केले. मुलीला उचलून घेऊन गेलेला आरोपी ऊसाच्या फडात लपला असल्याचे कळल्याने ऊस मालकाने आरोपीच्या ताब्यातील मुलीची सुटका करण्यासाठी थेट पूर्ण ऊसाला आग लावली. त्यावेळी अपहरणकर्ता बाहेर आला आणि कामगारांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आणि मुलीची सुटका केली. ही घटना वाळूज जवळील शिवपूर जवळ घडली.
अशी घडली घटना -
21 फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास ऊस तोडणीसाठी कामगारांचे तीन कुटुंबीय बैलगाडीने गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर साखर कारखाना येथून वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवपूर शिवाराकडे मार्गस्त झाले हाेते. पहाटे 3 वाजता ते बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहाेचले. त्यानंतर ऊसतोड कामगार मुलीच्या वडिलांनी तिन्ही मुलींना बैलगाडीत झोपले. नंतर ते ऊसतोडणीच्या कामाला लागले. तितक्यात चार वाजेच्या सुमारास त्यांना मुलींचा ओरडण्याचा आवाज आल्याने ते बैलगाडीच्या दिशेने धावले. तेव्हा 10 वर्षाच्या मोठ्या मुलीने 6 वर्षाच्या लहान बहिणीला एका अज्ञात व्यक्तीने उचलून ऊसात नेल्याचे सांगितले.
शेत मालकाने पेटवाला ऊस -
मुलीला वाचवण्यासाठी शेतमालकासह ऊसतोड कामगारांनी प्रयत्न सुरु केले. मात्र ऊसाच्या शेतात आरोपी बाहेर काढणे अवघड झाले असल्याने आरोपीला पकडण्यासाठी शेतमालक बाबासाहेब कचरू दुबिले यांनी थेट एक एकर ऊसाला आग लावली. त्यावेळी आरोपी विष्णू उत्तम गायकवाड बाहेर आला आणि कामगारांच्या हाती लागला. त्यानंतर मुलीच्या वडिलांसह कामगारांनी तिचा शोध घेतला. ऊसाच्या जवळच रडत असलेली मुलगी सुखरुप सापडली. आरोपी विष्णू उत्तम गायकवाड याला कामगारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Sugarcane Farmers Trouble In Niphad : मुकादमांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक; ऊसाला तोडच मिळेना