औरंगाबाद - ऐन मतदानाच्या वेळी जातीय समीकरण बदलल्यानेच आपला पराभव झाला, असे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी म्हटले आहे. या लोकसभा निवडणुकीत ते पार चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. एवढेच नाही, तर अक्षरशः अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचा पराभव करण्यासाठीच एमआयएमला उभे केले होते. त्यामुळे त्यांनी खोदलेल्या खड्ड्यात ते स्वतःच पडले, अशी प्रतिक्रिया सुभाष झांबड यांनी दिली आहे. निवडणुकीच्या काळात असलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला चांगला निकाल अपेक्षित होता. तसा प्रचारदेखील करण्यात आला. मात्र, मतदानाच्या वेळी मराठा समाजाने हर्षवर्धन जाधव यांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसी समाज चंद्रकांत खैरे यांच्या मागे गेला. तर दलित-मुस्लीम मते इम्तियाज जलील यांच्याकडे वळल्याने काँग्रेसला मते मिळाली नाहीत. त्यामुळे झांबड यांची अनामत रक्कम जप्त झाली, असे सुभाष झांबड यांनी म्हटले आहे. त्यांनी विजयी उमेदवार इम्तियाज जलील यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.