औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झांबड यांनी अर्ज सादर करताना त्यांच्या मालमत्तेत सहा कोटींची घट झाल्याचे नमुद केले आहे. झांबड यांच्या आणि कुटुंबियांच्या नावावर जवळपास २० कोटींचे कर्ज असल्याचे देखील अर्जात नमूद आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या चार चाकी वाहनाचे विवरण त्यात दिलेले नाही.
सहा वर्षांपासून आमदार असलेले सुभाष झांबड कुटुंबाची मालमत्ताही सहा वर्षांत सहा कोटींनी कमी झाल्याचे त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यायाकडे सादर केलेल्या शपथपत्रात दिले आहे. २०१३ मध्ये औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी त्यांची मालमत्ता ४० कोटी २६ लाख असल्याचे दाखवले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांनी कुटुंबाची स्थावर व जंगम मालमत्ता ३३ कोटी ७६ लाख असल्याचे म्हटले. झांबड फक्त बीकॉमच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिकले आहेत. पलीपेक्षा जास्त दागिने झांबड यांचे स्वतःचे आहेत. २१ लाख ८१ हजारांचे सोने (७२७ ग्रॅम), तर १३ किलो चांदी (५ लाख ८५ हजार) आहे. सहा वर्षापूर्वीही एवढेच दागिने त्यांच्याकडे होते. त्यांच्या पत्नीकडे १५ लाख किमतीचे अर्धा किलो वजनाचे सोने आहे. गतवेळीही तेवढेच होते. झांबड कुटुंबाकडे आरपूर आणि देवगाव येथे मिळून ८२ एकर शेतजमीन आहे. २0 कोटींचे कर्ज झांबड यांच्यावर आहे. स्वतःवर १३ कोटी ५८ लाख , त्यांच्या पत्नी ५ कोटी ४८ लाख व मुलगा ७७ लाख ९२ हजारांचे देणे लागतो. तेवढे कर्ज त्यांच्यावर आहे. झांबड कुटुंबाकडे किती मोटारी आहेत याचा उल्लेख शपथपत्रात नाही.