औरंगाबाद - वाळूज महानगरात कोरोना लसीकरणासाठी झालेल्या गर्दीत नागरिकांची चेंगराचेंगरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यादरम्यान, काही नागरिक लसीकरण केंद्राच्या प्रवेश द्वारातून खाली पडले असल्याचा विडिओ समोर आला आहे.
आरोग्य केंद्रावर नागरिकांची चेंगराचेंगरी -
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता नागरिक स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. लसींची कमतरता असल्याने उपलब्ध लस लवकरात लवकर मिळावी, याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाळूज येथील मोहटा देवी लसीकरण केंद्रावर निवडक नागरिकांना केंद्राच्या आत प्रवेश दिला जात होता. मुख्य गेट बंद असल्याने नागरिकांनी गेट उघडण्यासाठी गोंधळ घातला. त्यानंतर नागरिकांमध्ये लोटलाटी झाली. यात बरेच नागरिक खाली पडले. यात जेष्ठ नागरिकांचाही समावेश होता.
लसीकरण केंद्रावर झाला गोंधळ -
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. वाळूज परिसरातील मोहटा देवी येथील लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. गर्दी इतकी होती की, त्यांना आवर घालणे कठीण झाले होते. लवकर लस मिळावी याकरिता काही नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणेदेखील अवघड झाले होते. परिणामी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
हेही वाचा - 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'चा धोका: राज्यात पुन्हा निर्बंध; पाहा, काय सुरू काय बंद