औरंगाबाद - मैत्रीपूर्ण लढतीबाबतची भाषा करणारे भाजपचे शहाराध्यक्ष किशानचंद तनवाणी हे करमणुकीसाठी अशी वक्तव्ये करीत आहेत, असा चिमटा खैरेंनी काढला आहे. तसेच युती झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनीच मला फोन करून अभिनंदन केले होते, असेही खैरे यांनी सांगितले.
युती झाली नसती तर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी माझे काम केले असते, असे वक्तव्य शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले होते. खैरेंच्या या वक्तव्यानंतर भाजप शहराध्यक्ष तनवाणी यांनी पक्षश्रेष्ठींकडे मैत्रीपूर्ण लढतीची विनंती करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत विचारणा केली असता, खैरेंनी तनवाणींच्या वक्त्यव्यावर खुलासा केला.
युती झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका बैठकीसाठी आलेल्या खासदार खैरे यांनी युती झाली नसती तर भाजपच्या काही महिला पदाधिकारी निवडणुकीत माझे काम करणार होत्या, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपचे शहर अध्यक्ष किशांनचंद तनवाणी यांनी खैरेंना युती नको हवी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तसे सांगावे आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत. तशी पक्षश्रेष्ठीकडे विनंतीही करणार असल्याचे वक्तव्य केले होते.
तणवाणी यांच्या या प्रतिक्रियेबद्दल पत्रकारांनी खासदार खैरेंना विचारना केली असता, जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा सर्वप्रथम तनवाणी यांनीच मला फोन करू अभिनंदन केले. ते करमणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढतीचे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे असला कोणताही प्रकार होणार नसल्याचे खैरे म्हणाले.