छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - मराठवाडा दुष्काळाने होरपळत असल्याचा अनेकवेळा अनुभव आला आहे. आता जुलै महिना सुरू असला तरी म्हणावे तसे पर्जन्यमान झाले नसल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढत आहे. हे चित्र अनेकवेळा अनुभवायला मिळत असते, त्याकरिता पाणी बचत हा एकच पर्याय असला तरी आजही अनेकवेळा पाणी वाया जाते. विशेषतः घरात पाणी वापरताना अनेकवेळा पाण्याचा अपव्यय होतो. मात्र, त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्यावर शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या लहान मुलींनी एक उपकरण तयार करून पर्याय तयार केला आहे.
पाणी बचतीसाठी उपकरण - शारदा मंदिर कन्या प्रशालेत सातवी या वर्गात शिकणाऱ्या मुलींनी सध्याच्या भीषण पाणी प्रश्नावर उपाय म्हणून घरात वाया जाणारे पाणी बचतीसाठी आगळेवेगळे उपक्रम तयार केले. घरावर पाणी भरून ठेवण्यासाठी जवळपास प्रत्येकाच्या छतावर टाकी लावलेली असते. त्यात रोज मोटर लाऊन पाणी भरले जाते. मात्र ते करत असताना टाकी भरल्यावर पाणी वाहत जाते, मात्र बराच वेळा सर्वसामान्याच्या ते लक्षात येत नाही आणि पाण्याची नासाडी होते. मराठवाड्यात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष पाहता हे परवडणारे नसल्याने शालेय विद्यार्थ्यांनी पाणी बचतीसाठी उपकरण तयार केले असून त्यामुळे नक्कीच फायदा होईल असा विश्वास या लहान मुलींनी व्यक्त केला.
आठ दिवस केले काम - शारदा मंदिर येथे सातवी वर्गात शिकणाऱ्या सानवी देशपांडे, शब्दा शुक्ला, केतकी भाले, याज्ञी कुलकर्णी, शिवानी पाठक, अस्मिता भेरे या विद्यार्थिनींनी यावर्षी एक चांगले उपकरण तयार करण्याचा विचार केला. त्यात सध्याच्या परिस्थितीला अनुसरून पाण्याच्या बचतीसाठी उपकरण तयार करावा असे त्यांनी निर्णय केला. त्यासाठी आठ दिवस त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करून उपकरण कसे असावे याबाबत संशोधन केले. त्यासाठी संगणकावर आठ दिवस बारकोड तयार करत, त्याची रूपरेषा आखली आणि त्यानंतर शालेय प्रयोगशाळेत असलेल्या साहित्याने वापर करून एक नवीन उपकरण तयार करण्याचा प्रयोग त्यांनी केला. यामध्ये त्यांना यश मिळाले.
काय आहे उपकरण? - पाण्याची एक छोटी टाकी त्यांनी सर्वात आधी तयार केली. त्यात सेंसरचा वापर करत पाणी पातळीला अनुसरून एलईडी लाईट वापरले. जसे जसे टाकीत पाण्याची पातळी वाढेल तसतसे लाईट लागत जातील आणि शेवटी ज्यावेळेस पूर्ण टाकी भरेल, त्यावेळी आलाराम वाजून पाण्याची मोटर आपोआप बंद होईल, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. हे संशोधन पूर्णतः यशस्वी झाल्यानंतर मुली उत्साही झाल्या, यानंतर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
.
शाळेने दिले प्रोत्साहन - शारदा मंदिर कन्या प्रशाला ही शहरातील सर्वात जुनी मुलींची शाळा आहे. आजवर शाळेतील विद्यार्थिनींनी अनेक चांगले प्रकल्प तयार केले आहेत. त्यातील हा एक चांगला प्रयोग त्यांनी सादर केला. शाळेत असे अनोखी प्रयोग करण्यासाठी वेगळी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांनींना हवे असलेले साहित्य पुरवले जाते. शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांनी मदत केल्यामुळे हे उपक्रम तयार करणे सोपे झाले. त्यातून नवीन शिकायलाही मिळाले, अशी भावना विद्यार्थिनीनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्यातून ते घडतात याचा आनंद असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे यांनी व्यक्त केले.