औरंगाबाद - भिशीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली. गोविंद कुरीज या कंपनीने छोट्या व्यावसायिकांची शासनमान्य भिशी असल्याचा बनाव करत ही फसवणूक केली आहे. यामध्ये ४०० हून अधिक छोट्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
भगीरथ बजाज या भामट्याने औरंगाबदमधे आलिशान ऑफिस थाटून 'छोटी बचत'च्या माध्यमातून भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला. गोविंद कुरीज नावाने सुरू केलेल्या या भिशीत सुरुवातीला चांगला परतावा त्याने दिला. लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्याने जवळपास १० ते २० कोटींचा गंडा घालून पळ काढला.
औरंगाबादच्या गरखेडा येथे भगीरथ बजाज या भामट्याने भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. सरकारमान्य भिशी असल्याची बतावणी बजाज याने केली. या भिशीत त्याने छोट्या व्यावसायिकांना लक्ष करत वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक कारायला लावली. सुरुवातीला भिशीच्या माध्यमातून व्यावसायिकांना फायदा झाला. अनेक व्यावसायिकांनी रोजची कमाई बचत म्हणून गोविंदा कुरीजमध्ये जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करण्यासाठी भगीरथ बजाज यांचा कर्मचारी रोज कलेक्शनसाठी जाऊ लागला. पैसे जमा करताना सर्व ठेवीदारांना पासबुक देखील देण्यात आले होते.
सरकारमान्य भिशी असल्याचे सांगितल्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनी ज्यामध्ये विशेषतः पाणीपुरी विकणारे, भेळपुरीची गाडी लावणारे, फळ विक्री करणारे, छोटी किराणा दुकाने चालवणारे, सलून चालक अशा अनेक छोट्या व्यावसायिकांनी गेल्या ४-५ वर्षांपासून आपल्या कष्टाची कमाई गोविंदा कुरीजकडे जमा केली. मात्र, ३० डिसेंबरला अचानक भगीरथ बजाज याने कार्यालय बंद करत पळ काढल्याचे समोर आले. त्याने त्याचे मोबाईल बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे ठेवीदारांना कळले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा - पैठण-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह एकाचा जागीच मृत्यू
पोलीस आयुक्तांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले असून पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. २ दिवसात जवळपास ५० लाखांच्या फसवणुकीच्या तक्रारींची नोंद करण्यात आली असून हा आकडा १० कोटींच्या वर जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - मुंबई वगळता एमआयएमच्या राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त