मुंबई - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'औरंगाबाद की संभाजीनगर?'या मुद्यांवर राजकारण तापले आहे. औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांना लोकांना भाजपाने प्रश्न विचारले पाहिजेत. मात्र, ते उलट शिवसेनेलाच प्रश्न विचारत आहेत. म्हणजे भाजपा औरंगाबाद नावाच्या बाजूने आहे का? असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाने शिवसेनाला प्रश्न विचारू नये -
औरंगाबाद नावाबाबत शिवसेनेची भूमिका काय हे आशिष शेलार, काँग्रेस आणि अबू आझमी या सर्वांना माहित आहे. ३० वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला 'संभाजीनगर' म्हटले होते. भाजपाने कागदोपत्री हे नामांतर करायला हवे होते. मात्र, त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही. आताही जे लोक 'संभाजीनगर' नावाला विरोध करत आहेत त्यांना प्रश्न न विचारता भाजपा उलट शिवसेनेला प्रश्न विचारत आहे. भाजपाची एमआयएमसोबत मैत्री आहे. त्यामुळे आता भाजपानेच त्यांची समजूत काढावी, असे राऊत म्हणाले. औरंगाबादच्या विमानतळाला संभाजीनगर विमानतळ असे नाव द्यावे, याबाबत आम्ही केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. तो भाजपा का मंजूर करत नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही राऊत म्हणाले.
अखिलेश यादव सुपरमॅन -
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीबाबत एक अजब विधान केले होते. 'मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू?' असे ते म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव हे सुपरमॅन आहेत. त्यांना लसीची गरज नाही, अशी मिश्किल टीका राऊत यांनी यादव यांच्यावर केली आहे.