औरंगाबाद - शैक्षणिक संस्था चालकाला पंचवीस लाखांची खंडणी मागून पाच लाख रुपये स्वीकारणाऱ्या समाजवादी पक्षाच्या औरंगाबादचा प्रमुख महासचिव अमित कुमार सिंगला त्याच्या साथीदारासह पुंडलिक नगर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सिंग विरोधात या पूर्वीदेखील शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली
तक्रारदार शैक्षणिक संस्थाचालक सुनील पालवे यांची औरंगाबाद जिल्ह्यात अकरा शाळा आहेत. समाजवादी पक्षाचा प्रमुख महासचिव असणाऱ्या अमित कुमार सिंग आणि त्याच्या साथीदाराने पालवे यांच्या शाळेची माहिती काढून ती उघड न करण्यासाठी पालवे यांच्याकडे पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पालवे यांना खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पैशासाठी आरोपींकडून तगादा सुरू होता. तडजोडअंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारीवरून आज शहरातील विद्यानगर भागात पोलिसांनी सापळा रचला असता तिथे खंडणीचे 5 लाख रुपये घेण्यासाठी दोन वेगवेगळ्या आलिशान गाडीतून आरोपी सिंग आणि त्याचा साथीदार प्रशांत वाघरे हे तेथे आले व त्यांनी पालवे यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी स्वीकारली. दबा धरून बसलेल्या पोलिसांना पालवे यांनी इशारा करताच दोन्ही आरोपींना अटक करत गुन्ह्यात वापरलेली त्यांची दोन्ही वाहने जप्त केली आहेत.
हेही वाचा - चापानेर शिवारात आढळला १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह