औरंगाबाद - राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोरोना व्हायरसचा भीतीने औरंगाबादच्या पर्यटन व्यवसायालाही घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - राज्यात 'आणखी' एक कोरोनाबाधित रुग्ण; राज्यातील एकूण संख्या 32 वर पोहोचली
ऐन सुट्ट्यांमध्ये अवघे 5 टक्के पर्यटक पर्यटनस्थळांना भेट देत असल्याने पर्यटन व्यवसायावर परिणाम दिसून येत आहे. औरंगाबादमध्ये मार्च महिन्यापासून पर्यटकांची संख्या वाढत असते. त्यात रविवार म्हटले की, गर्दी दुप्पटीने वाढते. मात्र, रविवारी देखील पर्यटन स्थळं ओस पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनोचा हा परिणाम असाच राहिला, तर ऐन मौसमात पर्यटन व्यावसायिकांना मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - कोरोनाचा प्रभाव; 'या' कालावधीदरम्यान खंडपीठेही राहणार बंद
औरंगाबादेत बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेणी, पाणचक्की, दौलताबाद किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवल्याने या पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून हळूहळू पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. विदेशी पर्यटकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्याने हॉटेल आणि कार व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.