औरंगाबाद - मेहबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब शेख यांच्यावर करण्यात आला आहे. तर यावर खुद्द मेहबूब शेख यांनी खुलासा केला असून, त्यांनी तरूणीचे आरोप फेटाळून लावले आहे. तो मी नव्हे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
शिक्षिकेवर कारमध्ये केला अत्याचार?
सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या युवतीने दिलेल्या तक्रारीत सदर तरुणीने आरोप केला आहे की, १४ नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर पोहोचले असता मेहबूब नावाचा व्यक्ती कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणी मागील सीटवर बसली असता त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज जवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
महिलेला शरद पवार यांची भेट घडवून देण्याच दिले आश्वासन..
सिडको परिसरात राहणारी शिक्षिका शिकवणी सुरू करण्यासाठी इमारतीचा शोध घेत होती. त्यावेळी चांगली जागा शोधून देतो, असे आश्वासन मेहबूब शेख यांनी दिले. काही वेळा जागेची शोधाशोध घेण्यासाठी पीडित युवती मेहबूब शेखला भेटली. त्यावेळी मुंबईला जाऊन नौकरी बाबत प्रयत्न करू शकतो, असे मेहबूब यांनी सांगितलं. मुंबईला जाऊन शरद पवार यांची भेट घेऊ, ते आपल्याला मदत करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार मुंबईला जाण्याचे ठरले आणि 14 नोव्हेंबरला पीडित महिला आली त्यावेळी हा अत्याचार झाला. घडलेल्या घटनेनंतर पीडितेला मोठा आघात झाला. पीडिता घराबाहेर पडली नाही. मात्र नातेवाईकाने समजूत काढून तिला आधार दिला आणि तरूणीने पोलिसात तक्रार दिली.
ती माझ्या नावाची दुसरीच व्यक्ती - मेहबूब शेख
याविषयी मेहबूब इब्राहिम शेख यांनी आपल्या फेसबुकवरून लाईव्ह करत आपली बाजू मांडली आहे. ज्यात ते म्हणाले की, माझ्या नावाने गुन्हा दाखल झाला असला, तरी तो मेहबूब शेख मी नाही. शिरूर तालुक्यात दुसरा कोणीही मेहबूब इब्राहिम शेख नावाचा व्यक्ती नाही. कोणी असेल तर पोलिसांनी शोधावं. मात्र, सदरील महिलेला मी कधीही भेटलो नाही, दहा अकरा तारखेला मी मुंबईत होतो. तर १७ तारखेला मी माझ्या मूळ गावी होतो, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, हे आरोप खोटे असून, माझे राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.