औरंगाबाद - रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे. लासूर-पोटुळ दरम्यान रुळाला तडे गेल्याचे एका शेतकऱ्याला समजल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. पोटुळ येथे राहणाऱ्या अविनाश कुकलारे या शेतकऱ्याला रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांना माहिती कळवली. त्यावेळी एक रेल्वे भुसावळच्या दिशेने निघाली होती. वेळीच माहिती मिळाल्याने दुर्घटना टळली आहे.
हेही वाचा - माहुल प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वर्ष पूर्ण; मृतांना वाहिली श्रद्धांजली
रुळाला तडे गेल्याची माहिती मिळताच रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी अविनाश कुकलारे या शेतकऱ्याला रुळाच्या बाजूला लाल रंगाचे कापड घेऊन उभे राहण्याची विनंती केली. त्यानुसार कुकलारे यांनी रेल्वे रुळावर लाल कापड घेऊन उभे राहिले. सोमाणी यांनी माहिती दिल्यावर रेल्वे अधिकारी आणि अभियंता कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे औरंगाबादहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अशा प्रवाशांची गैरसोय झाली असून लवकरच सेवा पूर्व पदावर येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.