औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर राज्यात कोणी राजकारण करू नका, असा ईशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादेत दिला आहे. मराठा क्रांती मोर्चा ही एक चळवळ आहे. त्यामुळे याचा राजकारण करण्यासाठी उपयोग केला, तर असे करणाऱ्याला समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा ईशारा देखील यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर राज्यातील अनेक समन्वयक नाराज झाल्याच दिसून येत आहे. मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम मराठा क्रांती मोर्चाने केले होते. त्याचा गैरफायदा स्वार्थासाठी घेऊ नका, असे औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत समन्वयकांनी सांगितले आहे.
23 जुलैला काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाला एक वर्ष पूर्ण झाले. 23 जुलै हा दिवस मराठा समाजसाठी काळा दिवस मानला जातो. याचदिवशी काही लोकांनी मराठा क्रांतीमोर्चाच्या वतीने आगामी निवडणूका लढवण्याची भूमिका घेतल्याने समाज दुखावला गेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही. अनेक मागण्या प्रलंबित आहे. त्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. यामुळे राजकारण न करता सामाजिक लढा उभा करावा. अशी विनंती औरंगबाद येथिल पत्रकार परिषेदेत करण्यात आली आहे. यानंतरही कोणाला राजकारण करायचे असल्यास ते त्याने स्वत:च्या नावावर किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून करावे, असा ईशारा देखिल यावेळी देण्यात आला आहे.