औरंगाबाद - वेरूळ येथील घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त देवस्थान प्रशासन व पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. हिंदू धर्मात घृष्णेश्वराचे दर्शन महत्वाचे मानले जाते. शेवटचे असलेले हे ज्योतिर्लिंग असल्याने येथे दर्शन घेतल्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे.
वेरूळमधील ऐतिहासिक घृष्णेश्वर मंदिरात दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनसाठी येतात. या मंदिराचे निर्माण दहाव्या शतकात राष्ट्रकुट वंशातील राजा कृष्ण देवराय यांनी केले होते. हे मंदिर लाल रंगाची माती आणि दगड वापरून निर्माण केले असून 19 व्या शतकात इंदोरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्नोधार केला.
दरवर्षी येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली जाते. यावर्षी सीसीटीव्हीसह ड्रोन कॅमेऱ्याची नजर येथील गर्दीवर सुरक्षेच्या दृष्टीने असणार आहे. त्याबरोबरच औरंगाबाद शहरातून वेरूळला जाण्यासाठी परिवहन विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. अनेक भाविक रात्री पायी प्रवास करून पहाटे घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतात.