औरंगाबाद - मंत्री होताना संविधानाच्या साक्षीने नवाब मलिक यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. तरी समीर वानखेडे यांच्या परिवाराच्या आयुष्याबद्दल पातळी सोडून बोलत आहेत. यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांच्या जावयाला आठ महिने तुरुंगात रहावे लागले म्हणून ते अशा पद्धतीने सूड उगवत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
रविवारी (दि.31) औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरेकर म्हणाले, एनसीबी अधिकारी असलेले समीर वानखेडे यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला आठ महिने तुरुंगात ठेवल्यामुळे मलिक वानखेडे यांच्यावर आरोप करत असल्याचे दरेकर म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांबाबत सभागृहात भूमिका मांडणार
एसटी कर्मचाऱ्याचे संवेदनशील प्रश्न आहे. मी पण कंडक्टरचा मुलगा आहे. कर्मचाऱ्याच्या घरात होणार त्रास मला माहिती आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हायला हवे, अशी आमचीही मागणी आहे. याबाबत आम्ही सभागृहात भूमिका मांडणार आहोत, असेही दरेकर म्हणाले.
हे ही वाचा - तोंडोळी दरोडा आणि महिला अत्याचार प्रकरणी सातही आरोपींना अटक