औरंगाबाद - शहरातील सातारा परिसरातील भगवान बाबा बालिका आश्रमात अनोखी होळी खेळली गेली. येथे नैसर्गिक रंगांसह फुलांची उधळण करत इको फ्रेंडली होळी खेळण्यात आली. आधार युवा मंचच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता. बालिका आश्रमात राहणाऱ्या जवळपास 150 निराधार मुलांनी या होळीचा मनमुराद आनंद लुटला.
होळीत रंगांची उधळण करून सण साजरा करणे, ही प्रत्येक मुलाला आवडणारी गोष्ट आहे. मात्र, समाजात अशी अनेक मुले आहेत ज्यांना आई-वडिलांचे छत्र नसल्याने अनाथ आश्रमात रहावे लागते. अशा मुलांना होळीचा आनंद हा क्वचितच अनुभवायला मिळतो. अशा मुलांना होळीचा आनंद लुटता यावा, यासाठी औरंगाबादच्या आधार युवा मंचच्यावतीने भगवान बाबा बालिका आश्रमात येथे होळी उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. इको-फ्रेंडली रंगांचा आणि फुलांच्या पाकळ्यांचा वापर करुन होळी खेळण्यात आली.
हेही वाचा - ठाकरे-मुंडे यांच्या स्मारकाचे टेंडर घेऊ नका; इम्तियाज जलील यांचा ठेकेदारांना इशारा
या उपक्रमाला शिवसेना आमदार डॉ. आंबदास दानवे यांनीही उपस्थित राहून या मुलांसोबत होळी खेळण्याचा आनंद लुटला. या निराधार मुलांना आपले कोणीही नाही, ही भावना नष्ट करण्यासाठी आपण येथे आल्याचे दानवे यांनी सांगितले. मागील बारा वर्षांपासून निराधार मुलांसोबत होळी खेळत, पर्यावरण देखील जपत असल्याचे आधार युवा मंचचे प्रमुख सोमनाथ बोंबले यांनी सांगितले.