औरंगाबाद - एसी खरेदी केल्यानंतर बँक खात्यात पैसे पाठवल्याचा बनावट मेसेज पाठवून एका व्यापाऱयाची १ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबादेत घडली. यासंदर्भात व्यापारी संजय रावसाहेब वरकड (वय ४८ वर्षे, रा. शिवाजीनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
वरकड यांचे क्रांतीचौकात सुगंधा एअरकंडिशन नावाचे एसी विक्रीचे दालन आहे. ३ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वरकड यांना एका व्यक्तीने फोन करून लातूर येथून पाटील बोलत असल्याचे सांगितले. एसीची चौकशी करून त्याने त्याला चार एसी विकत घ्यायचे असल्याचे सांगितले. एसीची रक्कम भरण्यासाठी त्याने वरकड यांच्या बँकेची माहिती घेतली. काही वेळानंतर त्याने चार ब्ल्यू स्टार कंपनीच्या एसीचे १ लाख १६ हजार रुपये बँकेच्या खात्यात जमा केल्याचा मॅसेज वरकड यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. वरकड यांनी बँकेत पैसे जमा झाले की नाही, याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशी बँकेने त्यांना सर्व्हर डाऊन असल्याने खात्याची माहिती मिळू शकणार नाही, असे सांगितले. पैसे पाठवल्याचा मेसेज आल्याने वरकड यांनी त्यावर विश्वास ठेवत ट्रॅव्हल्सद्वारे पाटीलने सांगितलेल्या पत्त्यावर चार एसी पाठवून दिले.
एसी पाठवल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बँक खात्याची तपासणी केली. मात्र, बँकेत अशी कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरकड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रताप नवघरे करत आहेत.