औरंगाबाद - महानगरपालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. पालिका आयुक्त गेल्या काही महिन्यांपासून महानगर पालिकेत हजर नव्हते. त्यामुळे विकास काम ठप्प झाल्याचा आरोप करत नगरसेवकांनी आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत आपला रोष व्यक्त केला.
महानगरपालिका आयुक्त निपुण विनायक गेल्या काही महिन्यांपासून सुट्टीवर गेले आहेत. सुट्टी संपल्यावर निपुण वाढीव सुट्टीवर गेले आहेत. याआधी देखील त्यांनी अनेक वेळा सुट्टी घेतल्याने पालिकेचा कारभार होत नसल्याची ओरड नेहमीचीच झाली होती. त्यामुळे पालिका आयुक्त बदलून द्या, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती.
मंगळवारी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पालिका आयुक्त निपुण विनायक येतील अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. मात्र, निपुण विनायक सुट्टीवरुन परत आले नाहीत. प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी देखील सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहिल्याने नगरसेवकांमध्ये संतप्त भावना दिसून आली. संतप्त नगरसेवकांनी आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला. आयुक्त डॉ. निपुन विनायक बदलीसाठी प्रयत्न करीत आहेत. पण त्यांच्या बदली शासन अनुकूल नसल्याने आयुक्त 25 ऑक्टोबर पासून रजेवर गेले आहे. रजा संपल्यानंतर ही आयुक्त डॉ. निपुन विनायक यांनी रजा वाढवून घेतली आहे. आयुक्तांचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. मात्र, प्रभारी आयुक्त ही सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहिल्याने संतप्त नगरसेवकांनी आपला राग व्यक्त करत आयुक्त बदलून द्या, अशी मागणी केली.