औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी ऑनलाईन अर्ज भरून देण्याची सोय केली आहे. यामुळे येथे मजुरांची गर्दी होत असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्या टिकेला उत्तर देत खासदार इम्तियाज जलील म्हणाले, टीका करणाऱ्यांनी दारूची दुकाने उघडी ठेवण्याबाबत सूचना देणाऱ्या केंद्र शासनाला प्रश्न विचारावा. कारण, दारूच्या दुकानांसमोर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे टिकाकरांनी मोंदीना प्रश्न विचारावे.
एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही करत असलेले हे काम आमचे नसून हे सरकारने केले पाहिजे होते. मात्र, ते करत नसल्याने आम्हाला काम करावे लागत आहे. मजुरांकडे चांगले मोबाईल नाहीत, साधा मोबाईल असताना ऑनलाईन अर्ज कसे करायचे, अनेक डॉक्टर त्यांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत, प्रवास करण्यासाठी फक्त कागद देणार आहात का? त्यांनी जायचे कसे, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला.
खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात होणारी गर्दी पाहता सोशल मीडियावर सोशल डिस्टन्सच्या पालनाबाबत टीका केली जात आहे. मात्र, टीका करणाऱ्यांनी हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारा ज्यांनी देशात दारुचे दुकान उघडे करण्यासाठी परवानगी देऊन सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजलेत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. आमच्या कार्यालयात आम्ही बाहेरगावी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांचे अर्ज तयार केले जात आहेत. त्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आली असून ते त्या मजुरांची तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देत आहेत. सर्व कागदपत्र पोलीस आयुक्तालयात दाखल केले जात आहेत.
मजुरांना परवानगी मिळताच त्याची प्रत मजुरांना काढून देत असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. कोरोनाबाबत सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने कोरोना बाबत भीती दूर करावी, लोकांमधले संभ्रम दूर करावेत, असे झाल्यास काम सोपे होईल, असेदेखील जलील यांनी सांगितले.
हेही वाचा - अत्यावश्यक सेवा वगळता उघडली दुकाने .. कन्नडमध्ये 6 दुकानांवर गुन्हा दाखल