औरंगाबाद - जिल्ह्यात लॉकडाऊन बुधवारपासून सुरु होणार होते. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यासमोर दहा दिवस कसे पोट भरायचे? हा प्रश्न होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड घाबरलेले होते. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच आहे. या निर्णयाचे मी खासदार म्हणून स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या कडक लॉकडाऊनला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शविला होता. प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र प्रशासन या निर्णयावर ठाम होते. यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी पैठण गेट येथून आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्याचा निर्णय घेतला होता. आता प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय स्थगित केला आहे. यामुळे मोर्चा देखील रद्द करण्यात आला असल्याची माहिती जलील यांनी दिली.
जिल्हाधिकारी काय म्हणाले...
औरंगाबाद जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी मंगळवारी उशिरा रात्री (दि.30) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - प्रशासनाने अडवलं तरी आंदोलन होणार - खासदार जलील यांचा इशारा
हेही वाचा - औरंगाबादमधील लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित, जिल्हा प्रशासनाचा निर्णय