औरंगाबाद - विमाच्या पैशासाठी प्रियकराच्या मदतीने आईनेच स्वताच्या मुलाचे अपहरण करण्याची घटना घडली आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर मुलाच्या नावे बँकेत जमा असलेले सात लाख रुपयांसाठी आईनेच प्रियकराच्या मदतीने अपहरणाचा कट रचला. या प्रकरणी दोघा विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहा वाघ, राजू रायकवार असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तर आयुष असे अपहरण झालेली सहा वर्षीय मुलाचे नाव आहे.
नाशिक येथील शिवाजी साहेबराव आहेर यांच्यासोबत औरंगाबादमधील वेदांतनगर भागात राहणाऱ्या स्नेहा वाघ हिचा २०११ मध्ये विवाह झाला होता. पती शिवाजी आहेर हे कन्नडच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिवाजी आणि स्नेहा या दांपत्याला सहा वर्षीय आयुष व दोन वर्षीय संचित अशी दोन मुले आहेत. २०१७ मध्ये स्नेहाचे पती शिवाजी आहेर यांचे नांदगावच्या जुनी पंचायत समिती जवळ अपघाती निधन झाले. त्यानंतर मुलगी स्नेहा व दोन्ही नातवंडांना स्नेहाच्या आईने आपल्यासोबत औरंगाबादला आणले. मात्र मार्च २०१८ मध्ये स्नेहाच्या घराच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी काम करणारा मजूर राजू रायकवार यांच्याशी प्रेमाचे सूत जुळले व स्नेहा तिच्यासोबत पसार झाली होती.
तत्पूर्वी नोव्हेंबर -डिसेंबर २०१७ मध्ये स्नेहाच्या पतीच्या अपघाती विमाचे सात लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम औरंगाबादेतील आजी-आजोबांनी नातू आयुष्याच्या नावावर बँकेत जमा केली. त्या पैशावर मुलगी स्नेहाची नजर असल्याने तिने एक वर्षानंतर आई-वडीलाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. यावेळी तिने मुलगा आयुषचा ताबा आपल्याला देण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी वाघ दाम्पत्याला(आयुषचे आजी आजोबा) चौकशीसाठी बोलावून घेतले दाम्पत्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी स्नेहाचे समुपदेशन केले होते. त्यानंतर ती प्रियकराला सोडून आई-वडिलांसोबत घरी जायला तयार झाली पण तिने चार दिवसाची वेळ मागितला होता. त्याच काळात तिने मुलाचा ताबा मिळावा म्हणून वाघ दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने आठ मे रोजी तिचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे आयुष हा वाघ दाम्पत्याकडे होता. गुरुवारी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास आयुष इमारतीतील पार्किंगमध्ये खेळण्यासाठी गेला होता. यावेळी स्नेहा एका रिक्षामध्ये प्रियकर राजु राएकवारसोबत आली. तिने आयुषला फूस लावून रिक्षात बसवून पळवले. हा प्रकार आजी-आजोबांना कळाल्यानंतर त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली, पण आयुषचा थांगपत्ता लागला नाही. यामुळे स्नेहा व प्रियकर राएकवार विरुद्ध आजी अनिता वाघ यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली आहे.