छत्रपती संभाजीनगर Mohan Bhagwat On India Achievement : ''जगात फक्त भारत आपलं लक्ष्य पूर्ण करतो. बाकीचे फक्त गप्पा मारतात," असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी पैठण इथं व्यक्त केलं. एकेकाळी धर्मासाठी बलिदान द्यावं लागलं असताना अध्यात्मिक बैठकीत बसणारे लोकं भेटल्यानं राम मंदिर उभं राहीलं. आपल्याकडं असलेल्या अध्यात्मिक ताकदीमुळं आपण जगाचं नेतृत्व करू शकतो. देशात एकात्मता राहावी, त्यामुळे जगात भारत देश इतिहास घडवेल, असा विश्वासदेखील मोहन भागवत यांनी बोलून दाखवला.
मोहन भागवतांनी नाथ मंदिरात घेतलं दर्शन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पैठण इथं नाथ महाराजांच्या समाधी स्थळाचं म्हणजेच नाथ मंदिराचं दर्शन घेतलं. श्री एकनाथ महाराज चतुःशतकोत्तर रौप्य सुवर्ण समारोपी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ते प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते. यावेळी त्यांनी सर्वात आधी नाथ मंदिरात पाहणी केली. नाथ महाराजांचे वंशज योगीराज गोसावी यांनी प्राचीन मंदिराची त्यांना माहिती दिली. एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात पांडुरंगानं पाणी भरलं होतं, या प्रसंगाची माहिती यावेळी मोहन भागवत यांना देण्यात आली. त्यावेळी त्यांचं मन भरुन आलं. त्यांनी नाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिर विश्वस्तांनी यावेळी भागवत यांचं स्वागत करत त्यांना नाथ महाराजांचा फोटो आणि प्रसाद भेट म्हणून देण्यात आला.
म्हणून राम मंदिर बांधणं शक्य झालं : मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणानं काँग्रेस पक्षावर टीका केली. एकेकाळी धर्मासाठी आपले प्राण द्यावे लागले. वेगळ्या विचाराचं सरकार होतं. जेवायला अन्न नव्हतं, अंगावर कपडे नव्हते. तरीदेखील आपण अयोध्येमध्ये राम मंदिर बांधत आहोत. आध्यात्मिक बैठकीची लोकं एकत्र बसल्यानं हे शक्य झाल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. आपल्या देशात समानतेची वागणूक वाढली पाहिजे. किती बिकट परिस्थिती आली, तरी आपलं संतुलन बिघडता कामा नये. जे उचित आहे ते आपण करतो. त्यामुळं महाराष्ट्र जिवंत राहिला, इथली परंपरा देशात घेतली गेली, असं देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं.
भागवत धर्म शाश्वत आहे. आपल्याला सर्वांना सोबत जोडून पुढं जायचं आहे. आपल्याजवळ ग्रंथ आणि आदर्श आहेत. आपल्या मित्रांना सोबत घ्यायचं आणि त्यांच्या अडचणीत साथ देत पुढं जायचं- राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत
फक्त भारत आपलं ध्येय पूर्ण करतो : "संतांनी समाज घडवला म्हणून आपण उभं आहोत. सर्व ग्रंथ सांगतात सर्वांची सेवा करा, समदृष्टिनं सेवा करा. आपण सर्वांना सत्याची शिकवण देतो. जगात इतक्या समस्या आहेत, युद्ध सुरू आहेत. भारत फक्त लक्ष पूर्ण करतोय, बाकी कोणीही करत नाहीत, ते फक्त गप्पा मारतात. लहान मुलं शाळेत बंदूक घेऊन जातात, यावर उपाय कोणाकडं नाही. मात्र भारताकडं उत्तरं आहेत. त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. आम्ही आचरण सोडलं तर समाज भटकेल. जे ग्रंथात आहे ते जीवनात आणावं. आपलं उदाहरण लोकांनी घेतलं पाहिजे. समाजाला एकनाथी भागवताचं ज्ञान देणं गरजेचं आहे. मात्र त्याचा अर्थ काय आहे, हे लोकांना समजून सांगणं अधिक गरजेचं आहे. आत्मीय बुद्धीनं आचरण ठेवलं तर समाजात परिवर्तन घडते. देशाचं परिवर्तन होईल आणि त्यातून जगाचं भलं होईल." असा ठाम विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा :
- Mohan Bhagwat on Hinduism : हमास आणि इस्त्रायलसारख्या मुद्द्यावरून देशात कधीही भांडण झालं नाही, कारण...सरसंघचालक भागवत
- Mohan Bhagwat : लाभाच्या आशेने केलेले काम कधीही शाश्वत आणि सत्य नसते - डॉ. मोहन भागवत
- Dussehra 2023 : राजकीय स्वार्थापोटी अनिष्ट शक्तींशी युती करण्यात अविवेकीपणा - सरसंघचालक मोहन भागवत