औरंगाबाद - देशातील सरकार गरिबांसाठी काम करत आहेत. गरिबांसाठी याआधीही योजना होत्या. मात्र त्या नीट राबवल्या गेल्या नाहीत. परंतु, आमचे सरकार देशातील सर्व गरिबांना 2022 पर्यंत पक्के घरे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. औरंगाबाद येथील महिला सम्मेलनात ते बोलत होते. याशिवाय महिलांसाठी उज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅसेस वाटप करण्यात आले आहेत. मुद्रा योजनेचा महाराष्ट्रातील महिलांना लाभ झालेला आहे. त्यामुळे हे सरकार महिलांना सशक्त बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उज्वला गॅस योजनेअंतर्गत पाच महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील महत्त्वाच्या इमारतींचे त्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. 'माझ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार, महालक्ष्मी विसर्जन असताना सुद्धा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद'. असे म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये 44 लाख गॅस कनेक्शन आहेत. हे उद्दिष्ठ आपण कमी कालावधीत पूर्ण केले आहेत. शौचालय आणि पाणी या दोन समस्या महिलांच्या आहेत. त्या मिटल्या तर महिला सक्षम होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात राबवण्यात येणारा वॉडरग्रीड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे गावांना पाणी मिळेल. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख करोड रुपये पाण्याच्या अभियानासाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.