औरंगाबाद - महापालिका कोविड तपासणी केंद्रावर जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी तपासणी बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांना तपासणी सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत तर कुठे व्यापाऱ्यांना द्यायला महापालिकेकडे प्रमाणपत्र नाहीत त्यामुळे ही व्यापाऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.
औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील व्यापाऱ्यांना दुकान सुरू करण्याआधी कोरोना चाचणी अनिवार्य केली होती. मात्र, ऐनवेळी इतक्या व्यापाऱ्यांना तपासणी करुन घेणे शक्य नाही. त्यातच महापालिने आदेश काढले असले तरी त्यांचीच यंत्रणा सज्ज नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिका यंत्रणा सज्ज करा आणि नंतर तपासणी करा, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी केली आहे.
औरंगाबाद शहरात 10 ते 18 जुलै या काळात पुन्हा टाळेबंदी करण्यात आली होती. मात्र, 17 जुलैला सायंकाळी महापालिका आयुक्तांनी व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली. चाचणी प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी चाचणी करण्यासाठी शनिवारी गर्दी केली. मात्र, कोविड सेंटरवर कुठल्याच प्रकारची पूर्वतयारी नसल्याने व्यापाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांना तपासणी अनिवार्य करण्यात आली. असे असले तरी गेल्या दोन दिवसांमध्ये नियोजन नसल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या चाचण्या झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना आपली दुकाने सुरू करता आली नाहीत. तर सकाळी भाजी विक्रीसाठी येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना पाच हजारांचा दंड लावण्याची तंबी महापालिकेच्या पथकाने दिली. त्यामुळे महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टीव्ही सेंटर भागात कोविड तपासणी केंद्रावर गोंधळ घातला. नियोजन होईपर्यंत व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका, अशी मागणी मनसेने केली. टीव्ही सेंटर केंद्रावर मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्या सूचनेवरून चंदू नवपुते, दीपक पवार, युवराज गवई, राहुल कुबेर, संतोष कुटे, बाबुराव जाधव यांनी व्यापाऱ्यांना तपासणी प्रमाणपत्र देईपर्यंत तपासणी करू नये यासाठी आंदोलन केले.