औरंगाबाद - पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपमोसंबी मार्केट पाचोड येथे आता 'रेशीम उद्योग खरेदी विक्री केंद्र' आणि 'मोसंबी ग्रेडिंग व्हॅक्सींग पकेजिंग केंद्र', 'मोसंबी मृग बहरा'चा शुभारंभ झाला. हा कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे रोहियो मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, राज्यातील चौथे रेशीम उद्योग खरेदी विक्री केंद्र हे पैठण तालुक्यातील पाचोड येथे करण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीशी सामना करत कमी पाण्यावर येणारे पीक शोधले पाहिजे. त्यापैकी रेशीम उद्योग हा चांगला पर्याय असून मराठवाड्यात जालना, औरंगाबाद हे उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री व पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असल्याने, हे केंद्र सुरू करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी उस्मानाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीम हा विक्रीसाठी आणला असता प्रति किलो ५०० रुपये चा भाव मिळाला. तर, 'मोसंबी मिरग्या बहर खरेदी विक्री' शुभारंभप्रसंगी प्रति टन १४ हजार रुपयांचा भाव मिळाला. यावेळी ना भुमरे व्यापाऱ्यांचे कान टोचत म्हणाले, माझ्या समोर जो काही रेशीम व मोसंबीला आज भाव दिला तो उद्या देखील द्यावा. शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये, यावर लक्ष असुद्या असे ते म्हणाले.
हेही वाचा - गुजरातच्या व्यापाऱ्याची औरंगाबादेत दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या
याप्रसंगी जिल्हा रेशीम उद्योग केंद्रचे अधिकारी, पैठण कृषी बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, जिप माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी राज्यातील पाहिले 'मोसंबी ग्रेडिंग व्हॅक्सींग पॅकेजिंग केंद्रा'चे भूमिपूजन करण्यात आले. याबाबत बोलताना ना. भुमरे म्हणाले, मी ज्या खात्याचा मंत्री आहे तो ग्रामीण भागाशी निगडित असून शेती संबंधित आहे. येणाऱ्या काळात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेती ५ एकरची अट लवकरच काढण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी पाचोड सरपंच पवन तारे, माजी सरपंच अंबादास नरवडे, कोळीबोडख सरपंच निजाम पटेल, मुरमा सरपंच एकनाथ फटांगडे, भाऊसाहेब गोजरे, सामाजिक कार्यकर्ते लेखराज जयस्वाल, शिवाजी भलसिंगे आदी उपस्थित होते.
'रोहियो'चे कामे धाडसाने करा
तालुक्यात रोहियोची कामे प्रभावीपणे राबवण्यात यावी. ही सर्व कामे पारदर्शकपणे केल्यास भिण्याची काही गरज नाही. यासंदर्भात राज्यातील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले असून धाडसाने काम करा अशा सूचनाही ना भुमरे यांनी पैठण पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांना केल्या.
हेही वाचा - 'अजितदादांनी योजना तपासावी, मात्र ती पूर्ण करावी'