औरंगाबाद - हाथरस येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे धर्म व जात न बघता पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
क्रांती चौक येथे एम.आय.एम.तर्फे पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गप्पा कादरी, माजी नगरसेवक गंगाधर ढगे, माजी शहर अध्यक्ष समीर साजिद यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. इम्तियाज जलील यांनी यावेळी भाजपा सरकारवर निशाणा साधला. भाजपा सरकारमधील एकही महिला या घटनेविरुद्ध रस्त्यावर आली नाही, असे ते म्हणाले.
तसेच बाबरी मशिदीच्या निकालाबाबतही त्यांनी भाष्य केले. सर्व आरोपी निर्दोष असतील तर, मशीद हवेने पडली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी सर्व समाजाच्या नागरिकांनी रस्त्यावर येण्याची गरज असून असेच होत राहिले तर, पुढील काळ हा कठीण जाणार असल्याची भीती व्यक्त केली. प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गप्पा कादरी यांनी हाथरस येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.