औरंगाबाद - महानगरपालिकेतील घोटाळे बाहेर काढतील म्हणून महापौरांनी एमआयएमच्या नगरसेवकांना निलंबित केले, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तर नव्याने निवडून आलेल्या खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव महापालिकेत न मांडल्यानेही वाद उद्भवला आहे.
खासदार इमतियाज जलील यांचा लोकसभेत विजय झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे, असा प्रस्ताव एमआयएमच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. मात्र, शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. सर्व खासदारांचे एकत्रित अभिनंदन केले आहे. त्यामुळे नव्याने हा प्रस्ताव मांडता येणार नाही, असे महापौरांनी सांगितल्याने नव्या वादाची ठिणगी पडली.
महानगर पालिकेच्या सभागृहात गोंधळ घालणाऱ्या २० नगरसेवकांवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई चुकीची असून एमआयएमचे नगरसेवक महानगर पालिकेतील घोटाळे बाहेर काढणार होते. त्यामुळेच नगरसेवकांचे निलंबन केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
अभिनंदनाचा प्रस्ताव ३० सेकंदाचा ठेवला असता तर काही फरक पडला नसता. मात्र, अद्याप एमआयएमचा खासदार निवडणून आला हे वास्तव मान्य नसल्याने त्याचा राग पालिकेतील सत्ताधारी काढत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महानगरपालिकेत आमदार खासदार निवडणून आले तर अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे अभिनंदनाचा ठराव ठेवण्याची मागणी आमच्या नगरसेवकांनी केली होती. महानगर पालिका निवडणूक वर्षभरात आहे. त्याआधी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला. पुढील काही दिवसात महापौरांच्या गैरव्यवहाराचे पुरावे देऊ, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.