औरंगाबाद - राज्य सरकारने प्रलंबित मागण्या मान्य करून न्याय न दिल्यास मराठा क्रांती मोर्चा राज्यात सरकार विरोधात पायी दिंडी यात्रा काढणार आहे. पंढरपूर पासून या दिंडी यात्रेला सुरूवात होणार आहे. यासाठी येत्या 20 सप्टेंबरला तुळजापूर येथे मराठा संघटनांची बैठक आयोजित केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी राज्यात आंदोलन केली. मात्र, सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. इतकेच नाही तर एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचीही फसवणूक केली आहे. राज्यातला शेतकरी अडचणीत असून सरकार खोटी आश्वासने देऊन त्याचीही फसवणूक करत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी सरकारने मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा निवडणूक काळात राज्यात मराठा क्रांती मोर्चा सरकार विरोधात यात्रा काढणार असून जवळपास 150 सभा घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
हे ही वाचा - राष्ट्रवादी उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव करेल - नवाब मलिक
दरम्यान, सरकारने मराठा समाजाची आणि राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तुळजापूर येथे महत्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे राजकरण नको - इंदोरीकर महाराज