छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी महसूल विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महसूल विभाग किंवा जिल्हा परिषद या विभागाकडून हे काम वेगानं पूर्ण करण्याचा निर्धार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. तर रोहित पवार यांच्या कारखान्यावर कारवाई सुरु आहे, त्याबाबत आरोप केले जात आहेत. मात्र तपास यंत्रणा तपास करत आहेत. जर काही अडचण नसेल, तर घाबरण्यासारखं कारण नाही, असंही विखे पाटील यांनी सांगितलंय.
आरक्षण बाबत तातडीनं यंत्रणा काम करेल : मराठा आरक्षण बाबत सरकार लवकरच आपलं काम पूर्ण करेल. एका आठवड्यात समितीनं आपला अहवाल देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. काही प्रमाणात आरक्षणाबाबत काही आरोप झालेले आहेत. त्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तातडीनं दाखले उपलब्ध करुन देण्याचं धोरण शासनानं अवलंबलेलं आहे. नोंदी शोधताना मोडी लिपी वाचणारे लोक जिथं आहेत, त्यांची मदत घेण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. तर जीर्ण झालेल्या नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना हाय स्पीड स्कॅनर लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, सॉफ्टवेअरला त्याचा फायदा होईल, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय.
यंत्रणा त्यांचं काम करत आहेत : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीय. मात्र ती यंत्रणा आहे, स्वायत्त संस्था आहेत. त्या त्यांचं काम करत आहेत. निपक्षपातीपणे काम करत आहेत. त्यांचं काम त्यांना करु द्यायला पाहिजे. ज्यांना काही वाटत असेल, त्यांनी चौकशीला सामोरं जायला पाहिजे. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही, असं विखे पाटील यांनी सांगितलंय. वाळू धोरणाच्या बाबतीत व्यक्तिगत म्हटलं तर मी देखील समाधानी नाही, म्हणून त्यातील त्रुटी दूर करण्याच्या बाबतीत एक बैठक घेतली आहे. सर्व त्रुटी बाजूला करुन जेव्हा नवीन धोरण येईल, त्याची प्रभावी अंमलबजावणी करु असं विखे पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा :