छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange : काही वर्षांपूर्वी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ अनेक युवकांनी त्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून सहभाग नोंदवला होता. तसाच प्रतिसाद मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या संभांमध्ये पाहायला मिळतोय. गाव खेड्यासह शहरातील तरुण कार्यकर्ते जरांगे पाटील यांचे फोटो असलेले टी-शर्ट, झेंडे घेऊन सभांना गर्दी करताना पाहायला मिळतायत. त्यामुळं अशा सभांसाठी जरांगे पाटील यांचे फोटो असलेल्या खास टी-शर्टची मागणी वाढू लागली आहे.
युवतीनं तयार केलं डिझाईन : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरू केल्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेषतः मराठा युवक त्यांच्या पाठीशी उभे राहात आहेत. अपल्यापल्या परीनं आंदोलनात सहभाग घेत आहेत. त्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी सिडको भागात राहणाऱ्या कोमल अवधूत शिंदे या युवतीनं त्यांचे फोटो असलेले टी शर्ट तयार केले आहेत. मनोज जरांगे सभेत भाषण करत असलेला फोटो वापरून तिनं चार ते पाच प्रकारचं डिझाईन तयार केलं आहे. समाज माध्यमांवर त्याबाबत माहिती दिली असता, तिच्याकडे मोठ्या प्रमाणात टी शर्टची मागणी केली जात आहे.
ना नफा ना तोटा तत्वावर काम : कोमल शिंदे ही युवती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे स्लोगन असणारे टी शर्ट तयार करण्याचं काम करते. तीन महिन्यांपासून मराठा समाजाच्या आंदोलनानं जोर धरला आहे. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून या लढ्याला वेगळं स्वरूप मिळालंय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण काम करत आहेत. त्यानुसार कोमल शिंदे या युवतीला टी शर्ट तयार करण्याची संकल्पना सुचली. तिनं स्वतः चार ते पाच प्रकारचे आकर्षक डिझाईन तयार केले आहेत. तसंच याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. त्यामुळं तिच्या टी- शर्टला मागणी वाढत असल्याचं तिनं सांगितलंय.
मागणी वाढली : 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तिसरी संवाद यात्रा सुरू झाली. त्यांच्या सभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून समर्थन देण्यासाठी तरुण सहभागी होत आहेत. त्यामुळे जरांगे यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा फोटो असलेला टी शर्टचा घालून आंदोलक सभेला जात आहेत.
हेही वाचा -