औरंगाबाद - आज (शनिवारी) माजी अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले. अरुण जेटली यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले, त्यांच्यासोबत काम करताना जे शिकायला मिळाले ते मला माझ्या आयुष्यात व्यक्तिगत आणि राजकीय वाटचालीसाठी महत्वाचे आहे, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.
नुकतेच पक्षाच्या जेष्ठ नेत्या व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ आता जेटली यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली असून ती कधीही भरून निघणे शक्य नसल्याचे मत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
अरुण जेटली हे व्यक्ती म्हणून खूप मोठे होते. ते उत्तम वक्ते, उत्तम संसदपटू आणि उत्तम वकील म्हणून परिचित होते. त्यांच्या काळात त्यांनी केलेली भाषणे अभ्यासपूर्ण आहेत. फक्त भाजपचे खासदार, पदाधिकारीच नाही तर सर्वच पक्षातील नेते त्यांची भाषणे आवर्जून ऐकतात. त्यांच्या भाषणांमधूम बरच काही शिकायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरात निवडणुकीतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.