औरंगाबाद - अवकाळी पावसामुळे मका उत्पादक शेतकरी आणि व्यापारी चांगलाच अडचणीत सापडला आहे. विक्रीसाठी पाठवलेली मका परत येत असल्याने व्यापारी नुकसान सोसत असल्याचे पाहायला मिळल आहे. व्यापाऱ्यालाही पैसे मिळत नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे.
हेही वाचा - बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक
मराठवाड्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे दोन लाख 56 हजार हेक्टरवरील मका पिकाचे नुकसान झाले आहे. औरंगाबादसह राज्यातील आणि परराज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी गेलेला मका परत आला आहे. सर्वात खराब दर्जाचा असलेला मका दारू कंपन्यांमध्ये विक्री होतो. मात्र, दारू कंपन्यांनी देखील व्यापाऱ्यांनी पाठवलेला मका परत पाठवली आहे. अति पावसामुळे मक्याच्या कणसाला कोंब फुटले असल्याने मका खराब झाली असल्याने त्याचा उपयोग होणार नसल्याने बाजारात मका मातीमोल झाला आहे. त्यामुळे खराब झालेल्या मका पिकांचं करायचं काय? असा प्रश्न व्यापारी आणि शेतकऱ्यांना पडला आहे.
औरंगाबादच्या सिल्लोड महामार्गावर अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेला मका रस्त्यावर सुकायला टाकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये बराच मका हा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, विक्री न झाल्याने मक्याने भरलेल्या गाड्या परत आल्या. इतकंच नाही तर दारू कंपन्यांनी देखील मका पाठवण्यात आला मात्र, तोही देखील परत आला आहे.
मका चांगला असली की जवळपास 1 हजार 500 हून अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळतो. मात्र, परतीच्या आणि अवकाळी पावसाने मक्याची अवस्था वाईट झाली. त्यामुळे अवघ्या 500 ते 700 रुपये क्विंटल दराने शेतकऱ्यांना आपला मका द्यावा लागला. त्यात बऱ्याच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्वासन देऊन मका घेतला. मात्र, व्यापाऱ्यांनी पाठवलेला मका विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांना मोठं नुकसान होत असल्याने आता व्यापारी शेतकऱ्यांना पैसे देणार का? याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे मका व्यापारी आणि शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नुकतेच केंद्राचे दोन सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झाले होते. औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी या पथकाने केली. पहिल्या टप्प्यात मिळालेली मदत पुरेशी नसल्याचे शेतकऱ्यांनी या पथकाला सांगितले. राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहण्यासारखे असेल.