औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका १९ ऑगस्टला पार पडणार असून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. औरंगाबादच्या गांधी भवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांनी सुभाष झांबड यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांची आकडेवारी पाहता काँग्रेसचा विजय अवघड मानला जात आहे. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही पक्षाची उम्मेदवारी घेण्यास टाळताहेत. मात्र सुभाष झांबड यांना पुन्हा निवडणुकीत उभे करण्याची मागणी काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत. झांबड यांनी २०१३ च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव पाहता सुभाष झांबड निवडणूक लढवण्यास इच्छुक दिसून येत नाही. तरी पक्षाने सांगितले तर निवडणूक लढू, असे सुभाष झांबड यांनी सांगितले आहे. मात्र, विजय पक्का नसला तरी अपक्ष आणि इतर उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक जिंकू असा विश्वास, जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी व्यक्त केला आहे.