औरंगाबाद - वेरूळ घाटात वाघाचे दर्शन झाल्याची अफवा गुरुवारी उठली होती. एका व्हिडिओच्या माध्यमातून वेरुळ पर्यटनस्थळ परिसरात वाघ पाहिला असल्याचा दावा एका पर्यटकाने केला. मात्र तो वाघ नसून बिबट्या असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. खुलताबाद तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पर्यटकाने काढला व्हिडिओ-
गुरुवारी दि.29 जुलैला सकाळी सात वाजताच्या सुमारास वेरूळकडे जाणाऱ्या एका पर्यटकाने वेरुळ घाटात बिबट्या वावरत असताना एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर व्हायरल झालेल्या या व्हिडियाच्या माध्यमातून वेरूळ घाटात वाघ दिसल्याची अफवा पसरली. मात्र तो वाघ नसून बिबट्या असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
औरंगाबाद ते कन्नड असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. वेरूळ घाट हे संपूर्ण जंगलाने व्यापलेला परिसर आहे. या जंगलात अधिक प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे, प्रवाशांनी सावध प्रवास करावा. वनअधिकारी या जंगलावर नजर ठेऊन आहेत. पर्यटकांनी आणि प्रवाशांनी बिबट्या किंवा वाघ दिसल्यास त्यांचे व्हिडिओ अथवा फोटो काढण्याचे धाडस करू नये, असे आवाहन पेहरकर यांनी केले आहे.