औरंगाबाद - येथील कन्नड तालुक्यात 2012 साली बहुतांश लघु प्रकल्प व मध्यम प्रकल्प भरले होते. तर 820 मिलीमीटर एवढी मंडळ निहाय नोंद झाली होती. तेव्हा 108 टक्के पाऊस झाला होता. तेव्हा पासून 7 वर्षानंतर यावेळेस 829 मिलीमीटर मंडळ निहाय पाऊसाची नोंद झाली आहे. यात चिंचोली लिम्बाजी येथे 1 हजार 110 मिलीमीटर, करंजखेड 936 मिलीमीटर व नाचनवेल 890 मिलीमीटर अशी अतिवृष्टी म्हणून नोंद करण्यात आली आहे.
हेेही वाचा- ...म्हणून या अधिकाऱ्याने कार्यालयात लावला 'मी प्रामाणिक आहे' असा फलक
मागील 7 वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किवा शेतीसाठी लागणारे पाणी या सर्व समस्याला शेतकरी असू किवा सामान्य माणूस यांना सामोरे जावे लागले. यावर्षी या सर्व समस्या मिटल्या परंतु, शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कन्नड तालुक्यात पेरणीचे क्षेत्र 1 लाख 5 हजार 125 हेक्टर आहे. त्यात एकूण पेरणी 94 हजार 664 हेक्टर झाली. त्यात कापूस 49 हजार 804 हेक्टर, मका 34 हजार 962 हेक्टर, तुर 3 हजार 730 हेक्टर, बाजरी 2हजार 575 हेक्टर, ऊस 1हजार 450 हेक्टर, मुंग 1 हजार 143 हेक्टर, सोयाबीन 947 हेक्टर, भुइमुंग 611 हेक्टर, उडीद 852 हेक्टर अशी पेरणी झाली. मात्र, अतिवृष्टी झाल्याने बहुतांश पिकाचे नुकसान झाले. या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले होते. 1 नोव्हेंबर पासून 30 मिलीमीटर आवकाळी पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी अवकाळी पाऊस होऊ नये म्हणून शेतकरी प्रार्थना करत आहे.
पिण्याच्या पाण्याचा जो मुलभुत प्रश्न होता तो मिटला आहे. त्यात कन्नड शहराला पाणी पुरवठा करणारा अंबाडी मध्यम प्रकल्प 81 टक्के भरला आहे. नेवपूर मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. अंजना पळशी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. शिवना टाकळी प्रकल्प 41टक्के, गणेशपूर, वाघदरा, वडोड, निंभोरा, आंबा, वडनेर, शिरजगाव, माटेगाव हे लघु प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. कुंजखेडा लघु प्रकल्प 92टक्के, रीठी 80 टक्के असे प्रकल्प भरले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.