छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यात बीआरएस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. नांदेड येथे पक्षाचे प्रमुख के.चंद्रशेखरराव यांनी सभा घेतल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे 24 एप्रिल रोजी सभा घेण्याची नियोजन सुरू झाले आहे. या सभेनंतर राजकीय अनेक बदल दिसून येतील असा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. स्थळ अद्याप निश्चित नसले तरी सभा होईल आणि चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास बीआरएस समन्वयक गुलाम अली यांनी व्यक्त केला.
नांदेड नंतर शहरात होणार सभा: नांदेड शहरात बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी जाहीर सभा घेत आपल्या पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्रात राहण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर अनेक जिल्ह्यातून नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करायला सुरुवात केली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आणि नेते यांनी पक्षप्रवेश केला. हैदराबाद येथे जाऊन पक्ष कार्यालयात त्यांनी जाहीर प्रवेश केल्यानंतर, आता शहरात सभेची तयारी सुरू केली आहे. शहरातील मोठ्या मैदानावर ही सभा घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले असून, या सभेला अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास बीआरएस पक्षाच्या समन्वयकांनी केला आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी, पिकांचे होणारे नुकसान, या अशा परिस्थितीत तेलंगणा पॅटर्न शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो. त्यामुळे सभेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास समन्वयक गुलाम अली यांनी व्यक्त केला.
अनेक नेतेमंडळी बीआरएस पक्षात दाखल: मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही नेतेमंडळाने हैदराबाद येथे जाऊन बीआरएस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यामध्ये कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूर तालुक्यातील नुकतेच भाजप दाखल झालेले अभय चिकटगावकर, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कदीर मौलाना, शेतकरी नेते कैलाश तवार ही नेते मंडळी पक्षात दाखल झाली. शहरात होणाऱ्या सभेत अनेक कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश सोहळा सभेच्या निमित्ताने घेण्यात आला येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही तयारी सुरू करण्यात आली आहे, प्रत्येक मतदारसंघात ताकतीचा उमेदवार देऊन मत मिळवण्याची रणनीती आखण्यात येत असून सभा हा त्याचाच एक भाग मानला जातो.