जयसिंगराव गायकवाड यांची पदवीधर निवडणुकीतून माघार, राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा - Former Minister Jaysingrao Gaikwad News aurangabad
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत.पक्ष कोणतीही जबाबदारी देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच आता आपण राष्ट्रवादीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद - भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. निवडणूक लढवणार नसलो तरी भाजपला पाठिंबा देणार नाही, भाजपचा पराभव करणाऱ्या उमेदवाराचा, म्हणजेच राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दहा वर्षांपासून जबाबदारी नसल्याने नाराज
माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आपली पक्षावर असलेली नाराजी देखील यावेळी जाहीर केली. पक्षाची आमदारकी किंवा खासदारकी नको आहे. फक्त काही तरी जबाबदारी हवी, म्हणून काही तरी जबाबदारी द्या अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करत आहे. मात्र पक्षातील नेते मला गांभीर्याने घेत नाहीत. मी तीन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार राहिलो आहे. केंद्रात आणि राज्यात मंत्री म्हणून काम पाहिलं. माझा उपयोग करून पक्ष मजबूत करा अशी विनंती केली. मात्र तसे होत नसल्याने आपल्याला नाईलाजस्तव हा निर्णय घ्यावा लागत असल्याची खंत जयसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
पक्षात धनाढ्य लोकांची चलती
भाजपमध्ये अनेक वर्ष काम केले. खासदार, आमदार, मंत्री असूनही आजही साधं राहणीमान आहे. आजही माझं घर लहान आहे. माझ्याकडे धनशक्ती नसल्याने मला महत्व दिले जात नाही. असा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी केला. पहिले आम्ही एकाच रिक्षात दाटीवाटीने जायचो, आज पक्षातील नेते कार्यकर्ते मोठमोठ्या कारमध्ये येतात. भाजप आता पैसेवाल्यांचा पक्ष झाल्याने माझ्यासारख्या प्रामाणिक माणसावर अन्याय झाला. याची दखल केणीही घेत नाही. जर कामच नसेल तर पक्षात राहून काय फायदा? म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.
पक्षात अनेक जण नाराज
पक्षात माझ्या एकट्यावर अन्याय झाला नाही तर अनेकांवर अन्याय झाल आहे, असाही आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी केला. गेल्या काही वर्षांत पक्ष बदलला आहे. हा बदल होत असताना अनेक निष्ठावंत नाराज झालेत. एकनाथ खडसे यांची नाराजी वेगळ्या प्रकारची आहे. मात्र माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, ती पुढे येईल. त्यामुळे पक्ष सोडला आहेच, मात्र भाजपचा पराभव मराठवाडा पदवीधर मतदार संघात करण्यासाठी आता फिरणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव करू शकतात. त्यामुळेच त्यांना पाठिंबा देत आहे, मात्र राष्ट्रवादीत जाण्याचा सध्या विचार नसल्याचं मत जयसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केलं. जयसिंगराव गायकवाड यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
हेही वाचा - 'महाविकास आघाडी सरकारच्या मागे शनी लागून सरकार पडेल'
हेही वाचा - औरंगाबादमधील सर्व धर्मिय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली