वैजापूर(औरंगाबाद)- भारतीय सैन्यदलात प्रत्यक्ष सीमा रेषेवर कमांडो पदावर कर्तव्य बजावणाऱ्या औरंगाबादच्या एका जवानाने कोरोनाच्या विरोधातील लढाईतही मदतीचा हात पुढे केला आहे. केंद्र सरकारच्या कोरोना केअर सेंटरला तब्बल 5 लाख रुपयांची आर्थिक मदत या जवानाने दिली आहे. चंद्रकांत दादासाहेब त्रिभुवन असे त्यांचे नाव आहे. त्यांनी कोरोना सेंटरमध्ये आवश्यक ऑक्सिजन युनिटसाठी ही मदत दिली आहे.
देशभरात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. या घटनेमुळे बैचेन झालेले चंद्रकांत त्रिभुवन यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती कडूबाई दादासाहेब त्रिभुवन यांच्याशी चर्चा केली. त्यांना सैन्यदलाकडून मिळणा-या वेतनाच्या रकमेतून पाच लाखाचा निधी ऑक्सिजन युनिटसाठी केंद्र सरकारच्या कोविड सेंटरला दिला.
गृह प्रवेश सोहळा रद्द करुन शहीद जवानांच्या कुंटुबाला केली मदत -
वैजापूर तालुक्यातील नगिना पिंपळगाव येथील रहिवासी असलेले चंद्रकांत त्रिभुवन यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थिती वर मात करुन सैन्य दलात भरती झाले होते. ते सैन्य दलात सध्या कमांडो या पदावर कार्यरत आहेत. मात्र सीमेवर लढत असतानादेखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही त्यांचे सतत योगदान राहिले आहे. वैजापुरात बांधलेल्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम नियोजित होता. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलातील महाराष्ट्रातील जवान शहीद झाल्यामुळे दु:खी झालेल्या कमांडो त्रिभुवन यांनी गृह प्रवेश सोहळा रद्द केला. आणि ती रक्कम शहीद जवानाच्या कुंटुबाला सुपूर्द केली.
मागील वर्षात देशव्यापी लॉकडाऊनमुळे वैजापूरला ते अडकून पडले होते. त्या दरम्यान त्यांनी पोलीस व सैन्यदलात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना भरतीपुर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम जयहिंद अकादमीच्या माध्यमातून हाती घेतले आहे. सैन्य दलाकडून त्यांचा सेवा पदकांच्या सन्मानानेही गौरव करण्यात आला.