औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष शिल्लक आहे, मात्र त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी दावे - प्रतिदाने करायला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये शिंदे गटाचाच खासदार होणार असा दावा केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे, तर भाजप देखील जय्यत तयारी करत असून केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र यांच्या भांडणात पुन्हा मीच निवडून येणार, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
मी शिवसेनेत जाणार नाही : एकनाथ शिंदे गटाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पुढील खासदार शिवसेनेचा होणार असे सांगितले होते, त्यावर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत भुमरेंना मी शिवसेनेत प्रवेश करणार अस वाटत असेल अशी मिश्किल टीका खा इम्तियाज जलील यांनी केली. या अगोदर देखील दोघांच्या भांडणात मी निवडून आलो होतो. यावेळेसही तशीच परिस्थिती होणार आहे. त्या व्यक्ती रिक्त अजून कोणीही आले तरी पुढचा खासदार कोण हे जनतेला माहित आहे, असे सांगत त्यांनी औरंगाबादचे खासदार आपणच असणार, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
उपमुख्यमंत्र्यांवर केली टीका : औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलिस सहायक आयुक्त विशाल ढूमे यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली. त्यांच्याविरोधात सिटीचौक पोलिसात गुन्हा दाखल आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांसोबत केलेले हे कृत्य निंदनीय आहे. सर्व पुरावे असतानाही त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई व्हायला हवी होती. या संदर्भात मी डीजीला बोलणार आहे. देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, ते खूप आदर्शाच्या गप्पा मारतात, मग आता कारवाई करायला विलंब का? त्यांनी आता कारवाई करून दाखवावी, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
हेही वाचा : Teacher Graduate Election : महाविकास आघाडीला भाजपसोबत बंडखोरांचे आव्हान; नाशिक, औरंगाबादमध्ये डोकेदुखी वाढणार