औरंगाबाद - यावर्षीचा उन्हाळा राज्यभरातच तापदायक ठरत आहे. औरंगाबादमध्येही उन्हाने कमाल तापमान गाठले आहे. औरंगाबाद शहराच्या इतिहासातील गेल्या ६१ वर्षातील सर्वाधिक तापमान अनुभवत आहे. औरंगाबादने ४३.६ अंश सेल्सिअसचा पारा गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.
गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणाने शहराचे तापमान ३९ अंशावर पोहोचले होते. पण, तापमानाचा पारा वाढत गेला. चिकलठाणा वेधशाळेने ४३.६ अंश सेल्सिअसची नोंद केली आहे. एवढ्या तापमानाची नोंद ६१ वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. २६ एप्रिल १९५८ ला शहराने एवढे तापमान गाठले होते. वातावरणात मोठे बदल होत असून, येणाऱ्या दोन तीन दिवसात पारा आणखी वर चढणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या संगमावर तयार होत असलेल्या एका वादळाने तापमानात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे वादळ औरंगाबादसह भारताच्या अन्य पठार प्रदेशातील आर्द्रता खेचून घेण्याचे काम करते आहे. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता संपुष्टात येत आहे. औरंगाबादचा पारा ४४ अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वादळ मेच्या सुरुवातील चेन्नईलगतच्या किनाऱ्यावर धडकण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर औरंगाबादचे तापमान कमी होईल असे सांगितले जात आहे.