औरंगाबाद - लोकसभा मतदार संघाचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शहरात २०० ट्रॅक्टरची रॅली काढत अनोखा प्रचार केला. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हर्षवर्धन जाधव यांची आपले निवडणूक चिन्ह असलेल्या 'ट्रॅक्टर'ची भव्य रॅली काढली. त्यांच्या या अनोख्या प्रचाराची शहरात चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यभरात ते चर्चेत आले होते.
हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद लोकसभेसाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. ते या निवडणूकीत 'ट्रॅक्टर' या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आपले चिन्ह लोकांना लक्षात रहावे यासाठी त्यांनी शहरात २०० ट्रॅक्टरची रॅली काढली. या रॅलीला टीव्ही सेंटर भागातून सुरुवात झाली. जाधव यांनी शहरातील विविध भागातून ट्रॅक्टर रॅली काढून अनोखा प्रचार केला.
शहराच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, तो राजीनामा नामंजूर करण्यात आला. तेव्हा त्यांनी शिवसेना पक्ष सोडत स्वतःच्या पक्षाची स्थापना केली होती.
खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असल्याने आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना जाधव यांनी आपल्या प्रचार चिन्ह असलेल्या ट्रॅक्टरची भव्य रॅली काढून सर्वांच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.