औरंगाबाद: कन्नड तालुक्यात आज एक आगळा वेगळा पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कन्नडमध्ये एक मोर्चा काढला. पीक विमा मिळाला पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या पूर्ण करा, यासाठीचा हा मोर्चा होता. मात्र हा मोर्चा सुरू असताना संजना जाधव यांचे पती आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव खुर्ची टाकून बसले आणि त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पती - पत्नीचा राजकीय ड्रामा चर्चेचा विषय ठरला आहे.
पती आणि पत्नी विभक्त: संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद नवीन नाही. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वागणुकीमुळे कुटुंबात कलह पाहायला मिळाला. त्यात ईशा झा यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे संजना यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यात रावसाहेब दानवे यांनी संजना जाधव यांना राजकारणात सक्रिय करत आता कन्नड विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याची तयारी सुरू केली आहे. याच मतदार संघातून हर्षवर्धन जाधव 2 वेळेस आमदार होते, तर तेही पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे राजकीय कुटुंबात हाय होल्टज ड्रामा पाहायला मिळत आहे.
आंदोलनात हर्षवर्धन जाधव: शेतकऱ्यांसाठी दानवे कन्या संजना जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले. कन्नड शहरातून आंदोलनाला सुरुवात होत असताना त्यांचे पूर्वाश्रमीचे पती हर्षवर्धन जाधव या मोर्चाला आगळावेगळा विरोध करण्यासाठी खुर्ची टाकून रस्त्यात बसले. दरम्यान, जाधवांच्या समोरून मोर्चा गेला. त्यावेळी जाधव यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मोर्च्याच्यावेळी झालेल्या या राजकीय ड्राम्याची आता संपूर्ण राज्यभर होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य पूर्ण होत नसल्याने आपण आंदोलन करत आहोत. आंदोलनाची ही काही पहिलीच वेळ नाही, अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी आपण काम केलेले आहे. माझे वडील केंद्रीय मंत्री असल्याचे अभिमान आहे, असे संजना जाधव यांनी सांगितले. त्यांचे पूर्वाश्रमीचे पती हर्षवर्धन जाधव यांच्याबाबत त्यांनी बोलणे टाळले आहे.
हर्षवर्धन जाधव नेहमी वादात: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर मैत्रिणीला मारहाण केल्याचा आरोप आरोप करण्यात आला होता. त्यांची मैत्रीण इशा झा यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हर्षवर्धन जाधव हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. मनसेत असताना मंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घातल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्याकडून करण्यात आला. तसेच मुंबईला जाताना झालेल्या किरकोळ अपघातानंतर देखील पुणे शहराजवळ हर्षवर्धन जाधव यांचे भांडण झाले होते.
हेही वाचा: Shiv Sena : शिवसेनेची संपत्ती शिंदेंच्या रडारवर! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसणार?