औरंगाबाद - 'रावसाहेबांना कंसासारखा अहंकार आहे, त्यांचा अंत कंसापेक्षा जास्त भयानक असेल, त्यांची भाषा त्यांना अंताकडे घेऊन जाईल', अशी टीका माजी आमदार आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केली.
रावसाहेब दानवे यांच्या मग्रुरीमुळे त्यांचा अंत होईल -
रावसाहेब दानवे सातत्याने शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान करत आहेत. त्यांना असे वाटत की काही बोलायचं आणि मोदींजींच्या मांडीवर जाऊन बसायचं, असे होणार नाही. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे आणि भाषेमुळे ते आपल्या स्वत: अंताकडे जात आहेत. पुरातन काळापासून पाहिले तर अशा लोकांचा शेवटी सत्यानाशच झालेला आहे. तसाच अंत रावसाहेब दानवेंचाही होईल, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली.
मोदींनी दानवेंचा राजीनामा घ्यावा -
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी तातडीने त्यांना काढून टाकावे. दानवे बेताल वक्तव्य करत असतील आणि त्यांना कोणीही अडवणार नसेल, भाजपाला देखील याची किंमत मोजावी लागेल. मोदींजींच्या नावावर सर्व खपवले जाईल, असे वाटत असेल तर तसे होणार नाही. इंदिरा गांधींपासून इतर अनेक नेत्यांना लोकांनी डोक्यावर घेतले आणि नंतर पायाशी तुडवायला कमी केले नाही, हे देखील लक्षात घ्यायला हवे, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.
हर्षवर्धन जाधव यांनी दिला प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलना विषयी केलेल्या वक्तव्यांविरोधात प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. गारखेडा परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारच्या कार्यकर्त्यानी जवळपास तीन तास आंदोलन केले. या आंदोलनाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी पाठिंबा दिला. पाण्याच्या टाकीवर जाऊन जाधव यांनी प्रहारच्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले होते दानवे?
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला होता.