औरंगाबाद - दिव्यांग आंदोलकांनी महानगपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार अडवल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांना स्वत:ची गाडी सोडून रिक्षाने जायची वेळ आली. यासोबत काही नगरसेवकांना आपल्या गाड्यांऐवजी पर्यायी व्यवस्था करुन बाहेर जावे लागले.
दिव्यांगांसाठी असलेल्या निधी मिळावा यासाठी गेल्या वर्षभरापासून हे दिव्यांग महानगरपालिकेच्या खेटा मारत आहेत. अनेक वेळा आंदोलन करुनही शासनातर्फे देण्यात येणारा निधी मिळाला नाही. म्हणून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या जिल्हा काँग्रेस समितीच्या सदस्यांनी, महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचाच रस्ता अडवून आंदोलन केले. गुरुवारी औरंगाबाद महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू असताना अचानक दिव्यांग आंदोलकांनी आंदोलनाला सुरुवात केली. महानगर पालिकेचे मुख्य प्रवेशद्वार आंदोलकांनी अडवले. इतकेच नाही तर महापौरांची गाडी महालिकेत आणण्यासाठी असणारे विशेषद्वार देखील आंदोलकांनी अडवले. तसेच सर्वसाधारण सभा झाल्यावर एकही चारचाकी वाहन बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल
महापौरांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी दिव्यांगांच्या हक्काचे पैसे मिळेपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांना अंगरक्षकासह रिक्षाने दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. तर काही नगरसेवकांना आपली वाहन सोडून पर्यायी व्यवस्था करून पालिकेतून जावे लागले. यावेळी काही अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडाली होती.