औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील पांगरा तांडाच्या लोंजा शिवारात गावठी अड्ड्यावर पोलिसांना छापा टाकला. कन्नड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कन्नड ग्रामीण पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. नागद सर्कलमध्ये येणारा तांडा लोंजा येथे भिमराव भूरा मोरे, ज्ञानेश्वर ज्ञानू आबा हे दोघेजण हात भट्टी दारू तयार करुन विकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत हात भट्टी दारू करण्यासाठी लागणारे 20 हजार रुपये किंमतीचे 400 लिटर रसायन आणि 3 हजार रुपयांची तयार दारू असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे, भामरे, कुमावत व पोलीस मित्र समाधान पाटील यांनी केली.