औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा मागील वर्षीसारखी परिस्थिती ओढवू शकते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच, घाटी रुग्णालयात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहून शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केले.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम 'जैसे थे' ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
निमोनिया होणार नाही याची काळजी घ्या
कोरोनाची लक्षणे दिसली तरी नागरिक घरीच राहून उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार केले नाही तर निमोनिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, वेळीच निदान करून उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.
घाटी रुग्णालयात यंत्रणा सज्ज
मागील एक वर्षांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रत्यक्ष ताण आरोग्य यंत्रणेवर आला. घाटी रुग्णालयात सर्वसामान्य आजारांवर उपचार बंद करण्यात आले होते. आता दुसरी लाट आली तर आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सद्यस्थितीत कोरोनाचे 120 रुग्ण भरती आहेत, त्यात 50 रुग्ण अत्यवस्थ आहे. या आधी चारशेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. सध्या 248 ऑक्सिजन बेड, त्यात डायलिसीस 10 बेड, कोविड डायलिसीस 6 बेड आरक्षित आहेत.
व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात आली
मागील मार्चसारखी परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात निर्माण होण्याची शक्यता असल्याने मेडिसीन विभागात 208 खाटा सज्ज आहेत, या आधी 83 व्हेंटिलेटर उपलब्ध होते, त्याची संख्या वाढवण्यात आली असून, आज घडीला 100 व्हेंटिलेटर घाटीत आहेत. ऑक्सिजन बेड 600 आहेत. 155 पदांसाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच, मनुष्यबळ वाढणार आहे. रेमडेसिव्हीरचा 350 इतका साठा असून, अजून 1 हजार 600 इंजेक्शन मिळणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनामुळे पैठणचे नाथ मंदिर अंशत: बंद - प्रशासन