औरंगाबाद - गटारी अमावस्या म्हटल की तळीरामांसाठी मेजवाणीचा दिवस. अनेक मद्यपी या दिवशी मद्य आवर्जून पितात. तळीरामांचे व्यसन सुटावे यासाठी औरंगाबादेत दिवाळी पाहटेच्या धर्तीवर आगळा वेगळा 'गटारी पहाट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संजय झट्टू या सामाजिक कार्यकर्त्याने हा उपक्रम हाती घेतला असून १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात विडंबन गीत सादर केली जाणार असून त्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे.
संजय झट्टू यांचे औरंगाबादच्या सिडको भागात चहाचे एक छोटे हॉटेल आहे. मागील १५ वर्षांपासून ते व्यसनमुक्तीचा संदेश सर्वांना देत आहेत. ३१ डिसेंबर आणि १ ऑगस्ट रोजी दारू पिऊ नका असा संदेश ते प्रत्येकवर्षी देतात.
दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रम पहात असताना त्यांना गटारी पहाटची संकल्पना सुचली. संजय झट्टू यांनी स्वतःच व्यसनमुक्तीचा गीत तयार केला आहे. तसेच व्यसनमुक्तीच्या इतर गीतांचे सादरीकरण ते गटारी पहाटच्या निमित्ताने करणार आहेत. इतकेच नाही तर गाणी ऐकला येणाऱ्या श्रोत्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देत, त्यांना मसाला दूध पाजून पौष्टिक अन्न खाऊन सुदृढ राहण्याचा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे. युवकांनी व्यसन सोडावे यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे संजय झट्टू यांनी सांगितले.