औरंगाबाद- दरोड्याच्या तयारीने आलेल्या पुणे-अहमदनगरच्या टोळीला जिन्सी पोलिसांनी गुरूवारी रात्री पकडले आहे. ही कारवाई सावरकर चौक ते आझाद चौक दरम्यान करण्यात आली. यात तीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले तर दोघे पसार झाले आहेत. यावेळी सुनील अकुंश मळेकर, शेख नशीर शेख बशीर, शेख सलीम शेख बाबु या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. न्यायालयाने रविवारपर्यंत तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केली. तर समीर शब्बीर शेख आणि साहील शमसोद्दीन सय्यद हे दोन दरोडेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिन्सी पोलिसांचे पथक गुरुवारी गस्तीवर असताना मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एक कार (एमएच १२-ओएफ ५१०४) सावरकर चौक ते आझाद चौक दरम्यान संशयास्पद फिरताना दिसून आली. त्यानंतर गस्तीवर असलेले कर्मचारी नजीर पठाण व पोलीस शिपाई संतोष वाघ यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. पोलिसांचे वाहन पाठलाग करत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी कार उभी करून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस कर्मचारी वाघ यांनी त्यातील शेख नशीर याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. इतर दोघांनाही ताब्यात घेतले मात्र अंधाराचा फायदा घेऊन समीर शेख आणि साहिल सय्यद हे दोन दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर जिन्सी ठाण्याचे उपनिरिक्षक दिनेश सुर्यवंशी यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना एक स्टीलचा मोठा पाईप, लोखंडी रॉड, दोरी, एअर गन, मिर्च पावडर असे दरोडयासाठीचे साहित्य आढळून आले. या दरोडेखोरांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके करित आहेत.