औरंगाबाद - कोरोना विषाणूने राज्याला विळखा घातला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आता कोरोनाला थेट लढा देणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील कोरोनाच्या सपाट्यात सापडत आहेत. त्यामुळे, कन्नड शहरामध्ये पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
जाधव नर्सिंग होम आणि आय सी यू कन्नड तर्फे या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कन्नड पोलीस ठाणे शहर व ग्रामीण आणि वाहतूक पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा बीपी, शुगर, ई.सी.जी, शरीराचे तापमान, बॉडी मास ईंडेक्स या तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरात एकूण १०२ कर्मचारी व अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी जाधव रुग्णालयाचे डॉ. रविराज जाधव, डॉ. भूषण वानखेडे पाटील, डॉ. विलास पाटील इत्यादी डॉक्टरांनी पोलिसांची तपासणी केली. त्यांना रुग्णालयातील परिचारिका सिद्धी हारदे, राज ठाकूर, सचिन गिरी व इतर रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याप्रसंगी कन्नड खुलताबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूनील नेवसे, पोलीस उपनिरक्षक तेजनकर आदी अधीकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य पोलीस दलातील ७८६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात ८८ पोलीस अधिकारी आणि ६९८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मुंबईत ४, पुणे, सोलापूर, नाशिक येथे प्रत्येकी एक, अशा एकूण ७ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील पोलीस घराबाहेर आहे. यादरम्यान तांचा नागरिकांशी संपर्क येतो. त्यामुळे, पोलिसांना देखील कोरोनापासून धोका आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. अशा वेळेस जाधव रुग्णालय व आय सी यू कन्नड तर्फे जिल्ह्यात पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हे कौतुकास्पद असून कोरोनापासून पोलीस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी इतर रुग्णालयानेही मोफत चाचणी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा- औरंगाबादकरांची चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 500 च्या वर