औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील देशी दारूचे दुकान फोडणाऱ्या चौघांना पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून देशी दारूचे 28 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 74 हजार 888 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारूसोबतच चोरट्यांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील जप्त केला आहे.
भगवान वसंतराव जयस्वाल (रा. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर), पवन विजय जातेकर (रा. चेलीपुरा), गणेश सखाहरी गवळे (रा.चेलीपुरा) आणि प्रशांत दत्तप्रसाद शिरोसिया (रा.केळीबाजार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील सरकारमान्य देशी दारू दुकानाचे व्यवस्थापक नीतेश सुरेशलाल जैस्वाल हे बुधवारी रात्री दारू दुकान बंद करून घरी गेले होते. यानंतर चोरट्यांनी दुकान फोडून २८ बॉक्स दारू आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरला होता.
सुरक्षा रक्षकाला दारू पाजून केली चोरी
चोरी करण्याआधी आरोपींनी पार्टी केली. त्यामध्ये या दुकानाच्या सुरक्षा रक्षकाचा देखील समावेश होता. चोरट्यांनी या सुरक्षा रक्षकाला दारू पाजली. दारूच्या नशेत सुरक्षा रक्षक झोपी गेल्यानंतर चोरट्यांनी दारूचे दुकान फोडून 75 हजारांची दारू लंपास केली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अवघ्या चार तासांत म्होरक्या, चोरटे आणि चोरीची दारू विकत घेणारा अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.